बदलापूर : साडी खरेदी करून दिली नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या तीव्र वादातून पत्नीने आपल्याच अपंग पतीची कुकर डोक्यात मारून आणि गळा आवळून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापूर पूर्व येथील शिरगाव परिसरात घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरगाव परिसरात हरेराम सिंग आणि त्यांची पत्नी सुनीता देवी हे वास्तव्यास होते. मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास साडी खरेदी करण्याच्या मुद्यावरून या दाम्पत्यामध्ये वाद झाला. पतीने साडी खरेदी करण्यास नकार दिल्यानंतर सुनीता देवी यांचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात त्यांनी स्वयंपाकघरातील प्रेशर कुकर थेट हरेराम यांच्या डोक्यात घातला. हरेराम हे अपंग व अंथरुणाला खिळलेले असल्याने त्यांना स्वत:चा बचाव करणे शक्य झाले नाही. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांचा गळा दाबत खून केला.
या घटनेवेळी दाम्पत्याचा ७ वर्षांचा मुलगा घरातच उपस्थित होता. हत्येनंतर आरोपी महिलेने स्वत:चा बचाव करण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करणारा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जेव्हा मुलाचा जबाब नोंदवला, तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आले. चिमुकल्याच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेची कडक चौकशी केली आणि तिची चलाखी उघडी पडताच तिला तात्काळ अटक केली.
















