परभणी : परभणी जिल्हा परिषद सभापती पदासाठी गुरूवार, दि.२ एप्रिल रोजी निवड प्रक्रीया पार पडली. यात चारही विषय समित्यांच्या सभापतीपदी महिला सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे अध्यक्षासह सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारीपदी महिला अधिकारीच विराजमान असल्यामुळे जिल्हा परिषदेत ख-या अर्थाने महिलाराज सुरु झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हा. गटातील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्या लता वाकळे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर ४ विषय समित्यांच्या सभापती पदाकरीता गुरुवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ऐश्वर्या अजय चव्हाण, समाज कल्याण समिती सभापतीपदी पार्वती मुंढे तर अन्य दोन समित्यांच्या सभापतीपदी वैशाली पंकज अंबेगांवकर व कौशल्या शिंदे या नवनिर्वाचित सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर यांचा अपवाद उर्वरीत ५ ही जि. प. पदाधिकारीपदी महिला सदस्य विराजमान झाल्या आहेत.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता स्थापन करणा-या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर व समाजकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम महिला अधिकारी आहेत. त्यामुळे ख-या अर्थाने जिल्हा परिषदेत महिलाराज आले आहे.

