पुणे : जिल्ह्यातील शिरूरमध्ये गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरी गंगावणे या तरुणाचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजताच्या आसपास परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने नागरिकांनी धाव घेतली असता हरी गंगावणे गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. गोळ्या लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनास्थळी पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाची पाहणी
गोळीबाराची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिका-यांनीही घटनास्थळी पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील पुरावे तपासले.
















