निलंगा: प्रतिनिधी
पाणंद रस्त्याच्या वादातून डांगेवाडी येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोघांचा मृत्यू, तर चौघे जखमी झालेल्या प्रकरणात निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. पवार यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
दि.३ ऑक्टोबर २०१९ रोजी निलंगा तालुक्यातील डांगेवाडी येथे पानंद रस्त्याच्या कारणावरून शेतात काम करणा-या सुभाष दयानंद सुडे, दयानंद नामदेव सुडे व इतरांवर आरोपींनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सुभाष दयानंद सुडे आणि दयानंद नामदेव सुडे यांचा मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी मयत सुभाष सुडे यांचा मुलगा नामदेव सुभाष सुडे यांच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५०/२०१९ अन्वये खुनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता
. तत्कालीन पोलिस निरीक्षक परमेश्वर बी. कदम यांनी तपास करून प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि जप्ती पंचनामे आदींच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरलेले आरोपी ज्ञानोबा अंगद ओनामे, जगन्नाथ विश्वभर ओनामे, राजकुमार विश्वभर ओनामे, राम बाबुराव ओनामे आणि भागवत बाबुराव ओनामे, सर्व रा. डांगेवाडी, ता. निलंगा, जि. लातूर. यांना जन्मठेपेसह प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच कलम ३०२ सह १४९ अन्वये पाच वर्षे कारावास व प्रत्येकी ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास; कलम १४८ अन्वये तीन वर्षे, कलम १४७ अन्वये दोन वर्षे आणि कलम १४३ अन्वये सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कपिल व्ही. पंढरीकर यांनी बाजू मांडली. जल्हिा सरकारी अभियोक्ता एस. व्ही. देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले, तर अॅड. सी. जे. सबनीस-पाटील यांनी सहाय्य केले. कार्यालयीन कामकाजासाठी कनिष्ठ लिपिक एच. जी. बिरादार आणि कोर्ट पैरवी कर्मचारी सौ. ए. जी. कांबळे यांनी सहकार्य केले.
















