अंतरवाली सराटी : प्रतिनिधी
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी ‘मराठा मुली ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात’ या केलेल्या विधानाचा जरांगे यांनी आक्रमकपणे समाचार घेतला. मी आतापर्यंत सगळ्या नेत्यांवर बोललो, पण मी कधीच कोणत्याही जाती-धर्माच्या, हिंदू-मुस्लिम-बौद्ध कुणाच्याही लेकी-बाळींवर कधीच बोललो नाही. पण जर कोणी मराठ्यांच्या लेकी-बाळींवर असे बोलत असेल, तर ती १०० टक्के ‘वड्या-वघळीचीच औलाद’ आणि ‘घुरट पैदास’ आहे. जर तुम्ही आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकींबद्दल असे बोलणार असाल, तर मग आम्ही तुमच्याबद्दल बोलू का? मराठ्यांची पोरं आता शांत बसणार नाहीत, आम्हीही यापेक्षा वाईट थराला जाऊ शकतो.
मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर वेळ आल्यास मराठे हे सरकार पाडतील. सरकारने मराठ्यांच्या ५८ लाख नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी (जात पडताळणी) द्यायलाच हवी. जर यातील एकही नोंद सरकारने कमी केली, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे.
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे २० ते २५ ऑगस्टदरम्यान दौरा करणार आहेत. ते म्हणाले, माझी तब्येत बरी नसली, तरी मी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांचा (अकोला, बुलढाणा, यवतमाळ) दौरा करणार आहे. जर तब्येतीमुळे दौरा शक्य झाला नाही, तर मराठा समाजाने आणि युवकांनी घराघरांत जाऊन ही जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घ्यावी. २९ ऑगस्टला आपण अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार आहोत, पण हे उपोषण शांततापूर्ण असेल. जिथे अन्याय होईल, तिथे मराठ्यांच्या पोरांनी आक्रमकपणे आवाज उठवायलाच पाहिजे.
बावनकुळे, शिरसाटांनी मराठ्यांचा तळतळाट घेतलाय
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर जरांगे यांनी घणाघात केला. बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठ्यांचा इतका तळतळाट घेतला आहे की ते गोरगरिबांचे वाटोळे करत आहेत. हे लोक जाणीवपूर्वक याचिका करायला लावत आहेत आणि नाटके करत आहेत. पण ५८ लाख नोंदींपैकी एकही नोंद कमी केली, तर आम्ही सरकारला सोडणार नाही.
राधाकृष्ण विखे-पाटलांच्या भूमिकेवर संशय
मनोज जरांगे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केले. “विखे-पाटलांनी एक नवीनच प्रकार सुरू केला आहे. ज्यांची कुणबी प्रमाणपत्रे ‘व्हॅलिड’ झाली आहेत, त्यांच्या फेरतपासण्या लावल्या जात आहेत. सरकारने सांगावे, फक्त मराठ्यांच्याच फेरतपासण्या लावल्या आहेत की ओबीसी, एससी, एसटी सर्वांच्याच? असे जाणीवपूर्वक करून मराठ्यांचा उद्रेक होईल असे वागू नका. फडणवीस साहेब, तुमचे मंत्री माजल्यासारखे करत आहेत. तुमच्या सरकारविषयी सध्या विद्यार्थी, शेतकरी, दलित, मुस्लिम, आदिवासी आणि मराठा समाजात प्रचंड खदखद आहे. केव्हा सत्तेतून निसटून जाल, हे तुम्हाला कळणारही नाही.
अभ्यासकांना त्यांची जागा दाखवली
काल १६ ऑगस्ट रोजी जरांगे यांनी राज्यातील अभ्यासकांना बोलावले होते, मात्र अनेक जण उपस्थित राहिले नाहीत. यावर जरांगे म्हणाले, मी माझे कर्तव्य पार पाडले. मला कुणीही म्हणू नये की जरांगे आम्हाला बोलू देत नाही. पण जे लोक आले नाहीत, त्यांनी सिद्ध केले आहे की त्यांना गोरगरिबांशी आणि मराठा समाजाशी एकनिष्ठ राहायचे नाहीये, त्यांना फक्त मीडियात जाऊन स्वत:चे ज्ञान पाजळायचे आहे.
















