मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचं लग्न अखेर झालं आहे. राहत्या घरी दोघांनी लग्न केलं आहे. या लग्नाला आमिर आणि गौरी दोघांचंही कुटुंब होतं. आमिरचं हे तिसरं लग्न. पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने तिस-यांदा गौरीशी लग्न केले आहे.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅटची प्रेमकथा कोणत्याही फिल्मी स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. आमिर खान आणि गौरी स्प्रॅटची पहिली भेट दशकांपूर्वी बंगळुरूमध्ये झाली होती. मात्र, वेळेनुसार आयुष्याने दोघांना वेगवेगळ्या मार्गांवर नेले. यानंतर सुमारे २५ वर्षांनी दोघे पुन्हा भेटले. यावेळी जुनी मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. आमिर आणि गौरीने त्यांचे नाते ब-याच काळापासून मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवले होते.
आमिर खानने काही दिवसांपूर्वीच आपल्या विवाहाविषयी माहिती देताना, मोठा समारंभ न करता घरच्या घरीच नोंदणीकृत विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्यानुसार पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानाची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती आणि विवाहासाठी आवश्यक तयारीही पूर्ण करण्यात आली होती.
या खास प्रसंगी आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या पतीसह उपस्थित होती. तसेच मुलगा जुनैद खानदेखील वडिलांच्या या आनंदाच्या क्षणाचा साक्षीदार बनला. याशिवाय आमिर खानच्या बहिणीसह इतर जवळचे नातेवाईकही विवाह सोहळ्यात सहभागी झाले.
विवाह सोहळ्यासाठी सुमारे १०० ते २५० निवडक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. समारंभ अतिशय मर्यादित स्वरूपाचा असला तरी अनेक नामवंत व्यक्तींनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
अशातच मुंबईत मुसळधार पाऊस आणि रेड अलर्टची परिस्थिती असतानाही विवाहाच्या तयारीत कोणताही अडथळा आला नाही. विवाहाच्या आदल्या दिवशी घराबाहेर फर्निचर आणि खुर्च्या आणणा-या कर्मचा-यांचे फोटोही समोर आले होते. खराब हवामान असूनही सर्व व्यवस्था सुरळीतपणे करण्यात आली.
गौरी स्प्रॅट यांच्याशी झालेला हा आमिर खानचा तिसरा विवाह आहे. यापूर्वी त्याने १९८६ मध्ये रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. मात्र सुमारे १६ वर्षांच्या संसारानंतर २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर ‘लगान’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमिरची ओळख किरण रावशी झाली. दोघांनी २००५ मध्ये विवाह केला आणि त्यांना आझाद हा मुलगा झाला. मात्र २०२१ मध्ये आमिर आणि किरण यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, घटस्फोटानंतरही आमिर खानचे रीना दत्ता आणि किरण राव या दोन्ही माजी पत्नींसोबत मैत्रीपूर्ण आणि आदरयुक्त संबंध कायम आहेत. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसतात.
















