नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिर निर्माणासाठी आलेल्या देणग्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन, या संपूर्ण प्रकरणाला भाजप-आरएसएस इकोसिस्टमचा घोटाळा म्हटले आहे. तसेच, या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जयराम रमेश भाजपाच्या राजकारणावर टीका करताना म्हणाले की, सध्या भाजपाचे राजकारण तीन सूत्रांवर चालत आहे. व्होट चोरी, सीट चोरी आणि चंदा चोरी या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या प्रतिक्रियेला रमेश यांनी ‘लाजीरवाणी’ म्हटले आहे. स्वत:ला प्रामाणिक आणि राष्ट्रवादी म्हणवून घेणारी संघटना इतक्या मोठ्या घोटाळ्यावर गंभीर पावले उचलण्यास अपयशी ठरली आहे असा आरोप त्यांनी केला. मंदिरासाठी आलेल्या हजारो कोटी रुपयांच्या देणग्यांमध्ये अफरातफर झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या घोटाळ्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी जयराम रमेश यांनी केली. ते पुढे म्हणाले २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाचे संपूर्ण श्रेय घेणारे पंतप्रधान मोदी आता या महाघोटाळ्यावर गप्प का आहेत? त्यांनी देशासमोर येऊन स्पष्टीकरण दिले पाहिजे.
‘इलेक्टोरल बाँड्स’शी जोडले कनेक्शन
काँग्रेसने या देणगी घोटाळ्याचा संबंध भाजपाच्या जुन्या निवडणूक रोखे योजनेशी जोडला. सर्वोच्च न्यायालयाने ही योजना बेकायदेशीर ठरवली होती, याची आठवण करून देत रमेश म्हणाले की भाजपने आधी ‘चंदा दो, धंदा लो’ अंतर्गत शेकडो कोटी रुपये गोळा केले. त्यामुळे हा ‘चंदा बिझनेस’ भाजपच्या डीएनए मध्येच आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य भाजपा-आरएसएसशी जोडलेले आहेता. त्यामुळे या घोटाळ्याची माहिती पंतप्रधान, गृहमंत्री किंवा आरएसएसला नव्हती, यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे असेही काँग्रेसने म्हटले आहे.
आतापर्यंत काय कारवाई झाली?
उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या प्राथमिक अहवालानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी २५ जून रोजी एफआयआर नोंदवण्यात आला असून आतापर्यंत पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून सुमारे ८० लाख रुपयांची रोकड आणि विदेशी चलन जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
















