जळकोट : ओमकार सोनटक्के
सध्या जळकोट शहरात वास्तव्यास असलेले व जळकोटपासून जवळच असलेल्या पाखंडेवाडी येथील एका कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होत एकाच वेळी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सचिन सोपान मैलारे, बालाजी भानुदास मैलारे आणि अभय भानुदास मैलारे या तिघा भावांची अनुक्रमे चंद्रपूर, पालघर आणि पुणे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. एकाच घरातील तीन भावांना एकाच वेळी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाल्याने मैलारे कुटुंबासह जळकोट शहरातून तसेच पाखंडेवाडी येथील त्यांच्या मूळ गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तिघांनीही अभ्यासामध्ये सातत्य राखत मेहनत घेतली. परस्थितिी कोणतीही असो, ध्येय निश्चित करून सातत्याने अभ्यास केल्यास यश मिळू शकते, हे या तिघा भावांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे. सचिन सोपानराव मैलारे यांची चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. बालाजी भानुदास मैलारे यांची पालघर जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली असून, अभय भानुदास मैलारे यांची पुणे जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकाच कुटुंबातील तीन भावांची शिक्षक म्हणून नियुक्ती होणे असा प्रसंग क्वचितच घडतो .
















