24 C
Latur
Tuesday, July 29, 2025
Homeराष्ट्रीय‘ऑपरेशन सिंदूर, विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले

‘ऑपरेशन सिंदूर, विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले

 संसदेत चर्चा, प्रश्नांचा भडिमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाक दहशतवादी तळांवर थेट एअर स्ट्राईक केला. यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी आज लोकसभेत चर्चा सुरू झाली. सरकारच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ही चर्चा सुरू केली. यासाठी १६ तासांचा वेळ राखीव ठेवला आहे. चर्चेदरम्यान विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विविध मुद्यांवरून केंद्र सरकारला घेरले आणि पाकसोबत अटीविना युद्धबंदी का केली, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी लावून धरली.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २६ वेळा म्हणाले की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी पूर्ण केली. ते म्हणतात की, ५ लढाऊ विमाने पडली. प्रत्येक विमानाची किंमत करोडो रुपयांची आहे. आता मोदींनी युद्धात किती लढाऊ विमाने पडली, युद्धबंदी का झाली? पाकिस्तान खरोखरच गुडघे टेकण्यास तयार असेल तर तुम्ही का झुकले, पाकिस्तान फक्त आघाडीवर होता, चीन त्याच्या मागे होता, असे सैन्याच्या वतीने सांगण्यात आले. आज चीनबद्दल का बोलले नाही? युद्धात चीनने पाकिस्तानला किती मदत केली, हे आपल्याला सैन्याकडून नाही तर संरक्षणमंत्री आणि पंतप्रधान मोदींकडून जाणून घ्यायचे आहे. तसेच आपल्या लढाऊ विमानांनी जवळून हल्ला का केला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तरी कसा, हा हल्ला झाला तेव्हा गृह मंत्रालय काय करत होते, सीआयएसएफ काय करत होते, असे थेट सवाल उपस्थित केले तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर उभे राहिल्यावर तुमची उंची ५ फूट होते आणि ५६ इंचाच्या छातीचे माप कमी होऊन ३६ इंचांचे राहते. तुम्ही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना इतके का घाबरता, अशी विचारणा करीत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

सपा खासदार रामशंकर राजभर यांनी १०० दहशतवादी मारले गेले. पण यात त्या ४ दहशतवाद्यांचा समावेश होता की नाही, हे सरकारने सांगितले नाही. पहलगाम हल्ल्याचा बदलाही १८ दिवसांनी घेण्यात आला. देशात इतका संताप होता की त्यांना ऑपरेशन तंदूर हवा होता, सिंदूर नव्हे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही ऑपरेशन सिंदूरवरून केंद्र सरकारला घेरले आणि या मोहिमेला सिंदूर असे नाव देणे हा भावनांशी खेळ आहे, अशी टीका केली. काश्मीरमध्ये पावलापावलांवर जवान तैनात असताना पहलगाममध्ये जवान तैनात का नव्हते, पाकच्या विनंतीवरून युद्धविराम केला असेल तर बिनशर्त युद्धविराम का केला, आम्ही विश्वगुरू आहोत, पंतप्रधान २०० देशांत फिरून आले. मग हल्ल्यानंतर एकही देश भारतासोबत का उभा राहिला नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करीत सावंत यांनी सरकारला घेरले. राष्ट्रवादीचे खा. अमर काळे यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पाकव्याप्त काश्मीरवर
कब्जा का केला नाही?
तुम्ही म्हणत आहात की आमचे उद्दिष्ट युद्ध नव्हते. आम्ही विचारतो, ते का झाले नाही, तुम्ही म्हणत आहात, आम्हाला कोणाचीही जमीन घ्यायची नाही. मी विचारतो, पाकव्याप्त काश्मीर का घेतले नाही, देशाच्या हितासाठी, देशाला हे जाणून घ्यायचे आहे की, ५ दहशतवादी कसे घुसले, त्यांचा उद्देश काय होता, असा प्रश्न कॉंग्रेस नेते गौरव गोगोई यांनी उपस्थित केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR