पूर्णा : तालुक्यातील एरंडेश्वर आणि कात्नेश्वर गावांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने केळीच्या बागा जमिनदोस्त झाल्या आहेत. अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीची दखल घेत सोमवार, दि. ८ जून रोजी कृषी आणि महसूल विभागाने थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी एरंडेश्वर आणि कात्नेश्वर शिवारात पाहणीचा धडाका लावला. या पाहणीत मंडळ कृषी अधिकारी एस. एस. वाघ, सुपरवायझर स्वप्नील शिंदे, टी. जे. कदम, गोटवाल, तलाठी राठोड, तलाठी आयेशा आणि कृषी सहाय्यक विखे यांचा समावेश होता. यावेळी अधिका-यांनी बाधित शेतक-यांशी संवाद साधला. सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काढणीच्या तोंडावर आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतक-यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. वर्षभराची मेहनत क्षणात वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे खचले आहेत.
यावेळी शेतक-यांनी प्रशासनाकडे मदतीची आर्त हाक घातली आहे. केवळ पाहणी नको तर नुकसान भरपाई हवी, अशी भूमिका घेत शेतक-यांनी तातडीने पंचनामे पूर्ण करण्याची मागणी केली. प्रशासनाने कोणत्याही दिरंगाई शिवाय नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
















