लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांना शासन निर्णय दि. २ मार्च २०१९ अन्वये सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा १०, २०, ३० वर्षाच्या सेवेनंतर अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा लाभ देण्यात येतो. तसेच शासन निर्णय दि. २४ सप्टेंबर २०२४ अन्वये ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन त्यांना ग्रामपंचायत अधिकारी असे नामाभिदान करण्यात आले असुन पहिला लाभ एस-१४ विस्तार अधिकारी, दुसरा लाभ सहाय्यक गटविकास अधिकारी एस-१५, तिसरा लाभ गटविकास अधिकारी एस-२० असे करण्यात आले आहे. त्याचबरोबर शासन निर्णय दि. २ जुन २०२५ आणि दि. १३ ऑक्टोबर २०२५ अन्वये काल्पनिक रित्या वरीष्ठ पदाची सुधारीत वेतनश्रेणी लागु करण्यात आली आहे.
त्यानुसार लातुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मिना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र नागणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, सर्व कक्षअधिकारी यांच्या सर्वांच्या अभ्यास पूर्ण मार्गदर्शनाने ग्रामपंचायत अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मिना यांच्या स्वाक्षरीने सुधारीत वेतनस्तर लागु करण्याचे आदेश दि. २५ जुन रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार लातुर जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना यांचा लाभ होणार आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियन डी.एन.ई.१३६ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने सर्व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.















