चाकूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने (एआयओसीडी) ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टलद्वारे होणारा औषध व्यापार याच्या विरोधात बंद पुकारला आहे. या बंदमध्ये सहभागी होत बुधवार दि. २० मे चाकूर तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला व काळ्या फीती लावून निषेध केला.
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टलद्वारे होणारा औषध व्यापार तसेच जीएसआर ८१७ (ई) व जीएसआर २२०(ई) संदर्भातील मुद्द्यांवर शासनाने योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी केली होती. या विषयावर अनेक वेळा शासन व संबंधित अधिका-यांना निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावर बंदचे आवाहन करण्यात आले होते. चाकूर तालुका औषधविक्रेता संघटनेच्या वतीने बंद संदर्भात तहसिलदार व पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. बुधवारी दि.२० मे रोजी चाकूरसह तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळून व काळ्या फिती लावून निषेध केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरविंद बिरादार, सचिव विनोद निला, उपाध्यक्ष सुरज शेटे, गोवर्धन वट्टमवार, परमेश्वर हलकुडे, मुद्दशीर शेख, पदाधिकारी, औषध विक्रेते उपस्थित होते.
















