चाकूर : प्रतिनिधी
चाकूरच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक भागवत फुले यांची बिनविरोध निवड झाली असून पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा चाकूर नगर पंचायतीवर फडकला आहे. चाकूर नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी दि. १७ जुलै दुपारी १२ वाजता नगराध्यक्ष निवड प्रक्रिया नगर पंचायतीच्या सभागृहात पार पडली. उपविभागीय अधिकारी अहमदपूर तथा पीठासीन अधिकारी श्रीमती मंजुषा लटपटे यांनी सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भागवत फुले यांचा एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे भागवत फुले यांची चाकूर नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केले .
या सभेस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रतिक लंबे हे उपस्थित होते. या विशेष सभेस नगरसेवक करीमसाब गुळवे, साईप्रसाद हिप्पाळे, मिलिंद महालिंगे, अभिमन्यू धोंडगे, अरविंद बिराजदार, नितीन रेड्डी, सय्यद मुज्जमिल सय्यद, सौ.गोदावरी पाटील, सौ.ज्योती स्वामी, सौ.शुभांगी कसबे, सौ.शबाना सय्यद, सौ. शाहिनबानो सय्यद, कांबळे वैशाली, सौ.सुजाता रेड्डी आदी नगरसेवक उपस्थित होते.
















