जळकोट : प्रतिनिधी
भाषा संचालनालय विभागीय कार्यालय छत्रपती संभाजी नगर या कार्यालयाकडून जळकोट पंचायत समिती कार्यालयात शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा शंभर टक्के वापर होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तपासणी पथक बुूधवारी पंचायत समिती जळकोट येथे उपस्थित राहून अभिलेख पाहणी केली. तपासणी पथकात बाबासाहेब जगताप (सहाय्यक भाषा संचालक ) व लक्ष्मण जाधव (अधीक्षक), महेश लगड (अनुवादक), दिलीप भागवत लादे (वरिष्ठ लिपिक) यांचा समावेश होता. पंचायत समिती कार्यालयातील कामकाजात मराठीत भाषेच्या वापराबाबतच्या अभिलेखाची तपासणी करून सर्व कर्मचा-यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी सचिन काडवादे, वरिष्ठ सहाय्यक नितीन मुस्कावाड अरविंद पाटील, राजश्री स्वामी कनिष्ठ सहाय्यक सुनील तोडसाम, शेख मेनोद्दीन, सोमेश्वर डंबाळे हे उपस्थित होते. या तपासणीत कार्यालयातील आवक जावक नोंदवही तसेच लेखा विभागातील सर्व नोंदवहया हजेरीपट अधिकारी कर्मचारी यांचे सर्व प्रकारचे रजा अर्ज , रजा मंजूर केलेला मंजुरी आदेश तसेच कामकाज सादर करण्यास मदत पत्रावर दिलेले आदेश केलेल्या सूचना व शेरे, कार्यालयात प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव व त्यासंबंधीच्या कार्यालयांची टीप्पणी , कार्यालयाचा नामफलक सूचनाफलक अधिका-यांचे कार्य असण्याचे नाम फलक टेबलवरील नावाचा फलक कार्यालयात वापरले जाणारे रबरी शिक्के व मुद्रा हे सर्व मराठीत आहेत काय याची पाहणी केली .
सहाय्यक भाषा संचालक जगताप यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा, मराठी भाषा गौरव दिन, राजभाषा मराठी दिन व वाचना प्रेरणा दिन कार्यालयात साजरा करण्याच्या सूचना दिल्या तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी पुढील काळात त्यांची स्वाक्षरी ही मराठी भाषेतच करावी याबाबत सर्वांना सूचना दिल्या

