जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच परिसरातील काही गावांमध्ये दि३ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता .
जळकोट तालुक्यात यावर्षी पावसाने ऋजु दृष्टी दाखवली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आणि आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही चांगला पाऊस होत आहे. जळकोट तालुक्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे अनेक शेतक-यांनी आपल्या पेरण्या उरकल्या आहेत . काही शेतक-यांचे तर पिके उगवले आहेत. पेरणीनंतर पिकांना जसा पाऊस पाहिजे तसा पडत आहे. यामुळे पिकांची वाढही झपाट्याने होत आहे. लातूर जिल् त जळकोट तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. दि २ जुलैपर्यंत जळकोट मंडळात तब्बल १८८ मीलीमीटर पावसाचे नोंद झाली होती आणि आता परत तीन जुलै रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे. कधी मोठा पाऊस येतो तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दुपारी बारा वाजल्यापासून पाऊस पडत आहे. हा पाऊस भीज पाऊस असून या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे .
जळकोट तालुक्यात सलग पडणा-या पावसामुळे जमिनीत मोठा ओलावा निर्माण झाला असून , अनेक शेतीमध्ये पाणी साचून राहत आहे त्यामुळे अनेक शेतक-यांची आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. जळकोट तालुक्यातील घोणसी परिसरात दि ३ जुलै रोजी पावसाचे प्रमाण कमीच होते तर जळकोट तसेच वांजरवाडा या भागामध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते.















