लातूर : विनोद उगीले
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी लातूर यांनी वेगवेळ्या तीन तालुकास्तरीय समितीचे गठण करून सदरील नुकसानीचे पंचनामे १४ ऑक्टोंबरपर्यंत पुर्ण करून त्याचा सविस्तर अहवाल १५ ऑक्टोंबर रोजी पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र या गठित समितीतील अधिका-यांचा अजून ही एकमेकाशी मेळ जुळून आला नसल्याने त्यांना अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मुर्हुतच सापडला नसल्याने व ते जाय मोक्यावर पंचनाम्यासाठी आले नसल्याचे बाधित शेतक-यांतून बोलेले जात आहे. तर जिल्ह्यात प्रत्यक्षात मात्र अतिवृष्टीग्रस्ताना मदतीची बोळवण प्रत्यक्ष पंचनाम्यावर नाही तर प्राथमिक पाहणी अहवालावर मिळणार आहे.
जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेलेल्या असून जमिनींवर गाळ साचलेला आहे. तसेच शेतकन्यांच्या विहिरीचे नुकसान झाले आहे. त्याकरीता जिल्ह्यामध्ये उक्त बाबीचा पंचनामा करण्यासाठी सुसूत्रता यावी व विहित कालावधी अचूक व वस्तुनिष्ठ पंचनामे होण्यासाठी जिल्हाधिकारी लातूर यांनी दि. ८ ऑक्टोंबर रोजी तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांची वेगवेगळे तीन पथके तयार करून या पथकांतील अधिकारी, कर्मचारी यांनी उक्त बाबींचे झालेल्या नुकसानीचे जायमोक्यावर जावून प्रत्यक्षमध्ये फोटो काढून ते जतन करून ठेवावेत व त्यानुसार नुकसानीचे पंचनामे दि. १४ ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण करून तहसिलदार यांना संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल सादर करण्यात यावा तर तहसिलदार यांनी उक्त बार्बीच्या नुकसानीचा अंतिम अहवाल या कार्यालयास तालुकास्तरीय समितीच्या स्वाक्षरीचा दि. १५ ऑक्टोंबर रोजी सादर करावा असे आदेश दिले होते.
जिल्हाधिकारी यांनी गठित कलेल्या या समितीत शेतीपिकाच्या नुकसानीचे पंचनामे व याद्या तयार करणे या बाबीच्या पथकात पथक प्रमुख म्हणून मंडळ अधिकारी महसूल व सहाय्यक अधिकारी, कर्मचारी म्हणून ग्राम महसूल अधिकारी व नियंत्रण अधिकारी म्हणून तहसिलदार यांची नेमणूक केली आहे. तर जमीन खरडून जाणे, तसेच विहिर पडझड व गाळ साचून नुकसान झालेल्या बाबीच्या पथकात मंडळ अधिकारी कृषी विभाग यांची पथक प्रमुख्र म्हणून तर सहाय्यक अधिकारी कर्मचारी म्हणून कृषी सहाय्यक, भूकरमापक व शाखा अभियंता मृद व जलसंधारण विभाग तर नियंत्रक अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी यांची नेमणूक केली आहे. तर घरपडझड व घरात पाणी घुसून झाालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या बाबीच्या पथकात विस्तार अधिकारी (पंचायत) तर सहाय्यक अधिकारी कर्मचारी म्हणून ग्रमसेवक, ग्रामविकास अधिकारी व नियंत्रक अधिकार म्हणून गटविकास अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
















