देवणी : बाळू तिपराळे
देवणी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली असून त्याचा थेट परिणाम शेतीच्या मशागतीच्या कामांवर झाला आहे. मान्सूनपूर्व नांगरणी, कुळवणी, पेरणीपूर्व मशागत आदी कामांसाठी शेतकरी युद्धपातळीवर तयारी करीत असताना डिझेलअभावी ट्रॅक्टर व कृषी यंत्रसामग्री ठप्प पडण्याची वेळ आली आहे.
ग्रामीण भागातील अनेक पेट्रोलपंपांवर प्रशासनाच्या नियमांमुळे कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने शेतक-यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांश शेतक-यांची शेती गावापासून लांब अंतरावर असल्याने वारंवार पेट्रोलपंपावर जाऊन डिझेल आणणे खर्चिक आणि वेळखाऊ ठरत आहे. त्यामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. सध्या शेती मशागतीचा हंगाम सुरू असून येत्या काही दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत वेळेत मशागत पूर्ण न झाल्यास पेरणी उशिरा होण्याची भीती शेतक-यांकडून व्यक्त केली जात आहे.
हवामानाचा अंदाज बदलत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय ट्रॅक्टर चालक, शेतमजूर आणि कृषी व्यवसायाशी संबंधित घटकांनाही या टंचाईचा फटका बसत आहे. शेतक-यांनी प्रशासनाकडे शेतीकामासाठी कॅनमध्ये डिझेल देण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. डिझेल पुरवठा सुरळीत न झाल्यास शेती उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये डिझेलचा पुरवठा नियमित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
इंधन दरवाढीमुळे शेतकरी त्रस्त
सध्याच्या महागाईच्या काळात शेतक-याला वाटत आपण पिकवलेल्या शेतमालास व्यवस्थित भाव भेटत नाही. बैलजोडी ठेवून शेती करणे अवघड जात आहे म्हणून वाहनधारकांकडून कमी दरात मेहनत व्हावी, अशी अपेक्षा शेतक-यांची आहे पण शासनाने डिझेल पेट्रोलचे भाव वाढवलेले आहेत त्यामुळे कमी दरात शेतीची मेहनत करून देणे परवडत नाही.
-नारायण सोलनकर, वाहनधारक
















