लातूर : प्रतिनिधी
येथील अत्यंत सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि नामांकित एम. जे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. मेहुल राठोड यांचे १५ जुलै रोजी अकाली व दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या काही वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन देणा-या एका निष्णात डॉक्टरचा असा अचानक अंत व्हावा, या घटनेने संपूर्ण शहरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. मेहूल राठोड यांची वैद्यकीय क्षेत्रातील जागा कोणची घेऊ शकत नाही, असे यावेळी मान्यवरांनी सांगीतले.
डॉ. मेहुल राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद सभागृहात एका शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी वैद्यकीय, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि भावपूर्ण आदरांजली वाहिली.
प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. ईश्वर राठोड यांचे चिरंजीव असलेल्या डॉ. मेहुल यांनी वडिलांचा वैद्यकीय सेवेचा वारसा अत्यंत सक्षमपणे पुढे चालवला होता. एम. डी. आणि डी. एन. बी. या प्रगत पदव्यांसह १० वर्षांपेक्षा जास्त क्लिनिकल अनुभव असलेल्या डॉ. मेहुल राठोड यांनी लातूरमधील बार्शी रोड येथील एम. जे. हॉस्पिटलच्या माध्यमातून इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीमध्ये एक विश्वासार्ह नाव कमावले होते. अँजिओप्लास्टी आणि हृदयाच्या लयीचे व्यवस्थापन यांसारख्या गुंतागुंतीच्या हृदयविकारांवर जागतिक दर्जाचे उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात त्यांचे विशेष प्राविण्य होते.
या शोकसभेत बोलताना ललितभाई शाह, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अतुल देऊळगावकर, डॉ. हनुमंत कराड, दिगंबर मालेकर, निलेश ठक्कर, जयवंतराव काथवटे, हर्षवर्धन राव, प्रभू माळी, कमलेश ठक्कर, सुनील कोचेटा डॉ. संगमेश चवंडा डॉ. अशोक
दामोसकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वैद्यकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण करून गेलेल्या या महान डॉक्टरांना लातूरकरांच्या वतीने अत्यंत जड अंत:करणाने आणि अश्रूभूर्ण नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
















