खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यात भीषण दुष्काळी स्थिती आहे. पावसाअभावी पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला आहे. दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरुपी उपाययोजनेचा भाग म्हणून केंद्र सरकारने नद्याजोड प्रकल्प तातडीने राबविण्याची गरज आहे. विशेषत: लातूर, धाराशिव जिल्ह्यात हा प्रकल्प राबविणे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि ही आग्रही मागणी केली. त्यावर पाटील यांनी राज्य सरकारने तसा प्रस्ताव दिल्यास केंद्र सरकार नक्कीच मदत करेल, असे आश्वासन दिले.
मराठवाड्यात विशेषत: लातूर, धाराशिव जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नद्याजोड प्रकल्पाकडे पाहिले जाते. या भागाला पिण्याचे आणि शेतीसाठी लागणारे पाणी सहज उपलब्ध करून देता यावे, यासाठी नद्याजोड प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. मराठवाड्याला आधारभूत ठरणारा हा नद्याजोड प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करून अंमलबजावणीच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत, असे खा. डॉ. काळगे यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यावर राज्य सरकारने तसा प्रस्ताव दिल्यास केंद्र सरकार यावर नक्कीच विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
















