रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील तीन जिल्हा परिषद शाळांमधील उपलब्ध सर्व शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्राम बाल संरक्षण समिती व शालेय व्यवस्थापन समितीने केला आहे. शिक्षकांचे बीएलओचे काम तातडीने रद्द करावे किंवा शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (रेल्वे स्टेशन) येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ६३ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी केवळ दोन शिक्षक उपलब्ध आहेत मात्र, या दोन्ही शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने ते निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गेल्यास शाळा बंद ठेवावी लागते. जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून एक मुख्याध्यापक व दोन शिक्षक आहेत.
शिक्षण देणा-या दोन्ही शिक्षकांकडेही बीएलओची जबाबदारी असल्याने अध्यापनात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये ४ शिक्षकांची पदे मंजूर असताना दोन पदे रिक्त आहेत. उपलब्ध असलेल्या दोन्ही शिक्षकांनाही बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याचे ग्राम बाल संरक्षण समिती व शालेय व्यवस्थापन समितीने निवेदनात नमूद केले आहे.
समितीने २ जुलै रोजी तहसीलदारांकडे निवेदन देऊन तीनही शाळांतील शिक्षकांचे बीएलओ काम रद्द करावे किंवा तत्काळ पर्यायी शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष मधुकर गालफाडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रतन आचार्य, समितीचे सदस्य अनिल फुलारी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान दोन दिवसांत पर्यायी व्यवस्था न झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रेणापूर तहसीलदारांच्या दालनातच शाळा भरवण्यात येईल, असा इशारा कुलभूषण संपत्ते (शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य, पानगाव) यांनी दिला आहे.















