मुंबई : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू असतानाच दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात शनिवारी रात्री एक दुर्दैवी घटना घडली. ‘भुलेश्वरचा राजा’ची सुमारे २२ फूट उंच गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यानच अचानक कोसळल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झालेत, ज्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना बाळाराम मर्चंट रोडवरील कबुतरखाना, जय अंबे चौक परिसरात, मंडपापासून अवघ्या ५० फूट अंतरावर घडली असून, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली. मंडळाचं हे यंदाचं ६३ वे वर्ष असून, आगमन सोहळ्यात घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण मुंबईतील गणेशोत्सवाच्या उत्साहावर शोककळा पसरली आहे.
भायखळ्यातील अनिकेत देसाई यांच्या कार्यशाळेतून ही गणेश मूर्ती शनिवारी संध्याकाळी वाजतगाजत भुलेश्वरमधील आपल्या मंडपाकडे निघाली होती. मात्र, त्यापूर्वीच मूर्तीच्या विसर्जनाची वेळ ओढवली. मंडपापासून काही अंतरावर असतानच ज्या क्रेनवर या उंच मूर्तीचा भार तोलून धरला होता, ती क्रेन कमजोर निघाली आणि क्रेनमधून निसटलेली ही महाकाय मूर्ती कुणाला काही कळण्याच्या आत कोसळली. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी बृजेश जोशी यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी आहेत.
या रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संकेत नेवशे (वय ३३) यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं, तर जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बृजेश हेमंत जोशी (वय ३०) यांनाही मृत घोषित करण्यात आलं आहे
















