लातूर : प्रतिनिधी
मुरुड येथील ज्येष्ठ नेते, तब्बल १७ वर्षे पंचायत समिती सभापतीपदाची धुरा समर्थपणे सांभाळणारे कर्मयोगी यशवंतराव नाडे यांचा लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वयाची ९९ वर्षे पूर्ण करूनही सामाजिक व सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभव, कार्याची समृद्ध परंपरा आणि जनसंपर्काचा मोठा वारसा जपणारे नाडे आजही सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. सन १९५० पासूनच्या अनेक सामाजिक, राजकीय व सार्वजनिक घडामोडी आजही त्यांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून भूतकाळातील अनेक घटना, प्रसंग आणि आठवणी ऐकणे हा निश्चितच एक समृद्ध करणारा अनुभव आहे. मुरुडच्या विकासाबद्दलची त्यांची तळमळ आजही कायम आहे. मुरुडला तालुक्याचा दर्जा मिळावा, अशी त्यांची भावना आहे. यावेळी सुनीता अरळीकर, सीमा गायकवाड, सूमन लांडगे, दीपा आदमाने यांनी यशवंतराव नाडे यांचा सत्कार केला.
















