लातूर : प्रतिनिधी
पावसाळा संपत आला तरी धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पाणीसाठा न झाल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन मनपाने केले आहे. लातूर शहराला आज दि. १ ऑक्टोबरपासून ६ दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. जिल्हाधिका-यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणा-या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. पावसाळा संपत आला तरी मांजरा प्रकल्पात पाणीसाठा झालेला नाही. यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील विचार करून उपलब्ध असणारे पाणी काटकसरीने वापरण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
लातूर शहरात सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो परंतु दुष्काळी स्थिती आणि जिल्हाधिका-यांचे निर्देश लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा पुरावा यासाठी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. १ आक्टोंबरपासून शहरात ६ दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. आपापल्या नळांना तोट्या बसवाव्यात. नळ उघडे ठेवणे, गटारीत पाणी सोडणे यासारखे प्रकार टाळावेत. पाणी जपून वापरले तर उपलब्ध पाणी साठा अधिक काळापर्यंत वापरता येईल. यासाठी महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
















