मुंबई : प्रतिनिधी
एसटीने सुट्टीत प्रवास करणा-या सर्वसामान्य नागरिकांसाठी खिशाला चाट देणारी बातमी दिली आहे. एसटी महामंडळानं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता आणि त्यामुळं होणारी गर्दी लक्षात घेता भाडेवाढ केली आहे. माहितीनुसार, साध्या बसेसच्या दरामध्ये दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ जून या काळासाठी ही वाढ करण्यात आली आहे. फक्त साध्या बसेसला ही दरवाढ लागू होणार असून एसी किंवा शिवशाही, शिवनेरी तसंच शिवाई बसेसला ही दरवाढ लागू होणार नाही.
राज्य परिवहन मंडळाने एसटी महामंडळाला विशिष्ट कालावधीत भाडेवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळानं उन्हाळी गर्दीच्या हंगामामध्ये साध्या बससेवा प्रवास भाडे दरात दरवाढ केलीय. दहा टक्के इतकी दरवाढ करण्यात आली आहे.
यात्रा, सणासुदीचा काळ, सुट्ट्या, सप्ताह अखेर या कालावधी दरम्यान ३० टक्के दरवाढ करण्यास मान्यता एसटी महामंडळाला मिळाली आहे. या अनुषंगानं एसटी महामंडळानं उन्हाळी गर्दीच्या हंगामामध्ये ही दरवाढ लागू केली आहे. वातानुकूलित शिवनेरी, शिवशाही तसंच शिवाई या बससेवासह निम आराम (हिरकणी) आणि शयनयान बसेसची तिकीट दरवाढ केलेली नाही.
‘या’ बस सेवांना दरवाढ नाही
साधा बससेवा प्रकार वगळता निमआराम, विनावातानुकुलीत शयनआसनी, विनावातानुकुलीत शयनयान, शिवशाही (वातानुकुलीत), जनरिवनेरी (वातानुकुलीत), शिवनेरी (वातानुकुलीत), ९ मीटर ई-बस (वातानुकुलीत), १२ मीटर ई-बस,ई-डिवाई (वातानुकुलीत) या बससेवा प्रकाराच्या प्रवासभाड्यात उन्हाळी गर्दीच्या हंगाम कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.

