शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी शिरूर अनंतपाळ तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण तालुका अक्षरश: ओलाचिंब झाला. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच समाधानकारक आणि सर्वदूर झालेला पाऊस असल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.अपु-या पावसामुळे अनेक ठिकाणी खरीप पिके करपण्याच्या मार्गावर होती तर काही शेतक-यांनी पेरणीच केली नव्हती.
या दमदार पावसामुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका, कापूस आदी खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तसेच जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने उर्वरित पेरणीच्या कामांनाही वेग येणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते मात्र, झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामाबाबत नव्याने आशा निर्माण झाली आहे. शेततळी, ओढे-नाले आणि विहिरींमध्येही पाण्याची आवक सुरू झाली असून ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण आहे. कृषी विभागाच्या मते, पुढील काही दिवसही पावसाची साथ कायम राहिल्यास खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळेल आणि उत्पादन वाढीसही मदत होईल. दमदार पावसामुळे तालुक्यातील शेतक-यांच्या चेह-यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलले आहे.
















