लातूर : प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचलित येथील श्री देशिकेंद्र विद्यालयात दर आठवड्याच्या पहिल्या व दुस-या शनिवारी शिक्षक-पालक-बालक सुसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शनिवारी मुलींच्या विभागाचा सुसंवाद उपक्रम पार पडला या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शनिवारी सकाळी ९.३० ते १२ वाजेपर्यंत हा शिक्षक -पालक- बालक सुसंवाद उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रत्येक शिक्षकांशी पालकांचा सविस्तर सुसंवाद घडावा यासाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली होती. विद्यालयाच्या वतीने मुलींच्या विभागासाठी करण्यात आलेल्या विशेष नियोजनाचे, सुरक्षेचे आणि शिस्तीचे पालकांनी भरभरून कौतुक केले व आपल्या पाल्याच्या शैक्षणिक वातावरणाबाबत समाधानही व्यक्त केले..
मुख्याध्यापक शिवाजी कोळी यांनी या उपक्रमाचे महत्व विषद केले.हा उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी कोळी, उपमुख्याध्यापक एस. एस. स्वामी आणि पर्यवेक्षिका श्रीमती कल्पना देवगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
















