नांदेड : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी नांदेडमध्ये विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थीविरोधी शिक्षण धोरणात तातडीने बदल करून परीक्षा पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.
नांदेड शहरातील नवीन मोंढा येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, रिक्त असलेल्या स्टेनो पदांची तातडीने भरती करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शिक्षण आणि भरती प्रक्रियेत आवश्यक सुधारणा कराव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करून शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याने परिसरात काही काळ उत्साही वातावरण निर्माण झाले.
















