लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनच्या दरात बुधवारी तेजी आल्याचे दिसून आले. यावर्षी आडत बाजारात सोयाबीनचा दर पहिल्यांदाच ८ हजार ५१ रूपयांवर पोहचला आहे. दोन दिवसाखाली सोयाबीनचा दर घसरला होता. मात्र बुधवारी सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ झाल्याचे चित्र दिसून आले.
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी सोयाबीन काढणीच्या पूर्वी अतिवृष्टी होऊन खरीप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनातही मोठया प्रमाणात घट झाली. सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी गरजेनुसार सोयाबीन आडत बाजारात विक्रीस आणले. तर कांही मोजक्या शेतक-यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेत सोयाबीन तारण ठेवून आर्थिक गरजा भागवण्याचा निर्णय घेतला. सोयाबीन तारण ठेवलेल्या ज्या शेतक-यांनी अद्याप सोयाबीनची विक्री केली नाही. त्यांना या सोयाबीनच्या वाढत्या दराचा लाभ होणार आहे. आज घडीला कांही मोजक्या शेतक-यांकडे सोयाबीन शिल्लक आहे. तसेच व्यापा-यांकडेही सोयाबन असल्याने त्यांना या वाढत्या दराचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी शेतक-यांकडील सोयाबीन जवळपास संपत आले
आहे.
सोयाबीनला या वर्षाचा सर्वाधिक दर
लातूरच्या आडत बाजारात जानेवारी पासून सोयाबीनचे दर ५ हजार रूपयांच्यावर आहेत. ३१ जानेवारी रोजी सोयाबीनला ५ हजार ९२३ रूपये असा दर मिळाला. दि. १३ फेब्रुवारी रोजी सोयाबीनला ५ हजार ४६० रूपये दर मिळाला. २० मार्च रोजी सोयाबीनला ५ हजार ५६० रूपये दर मिळाला. दि. ३० एप्रिल रोजी सोयाबीनला ६ हजार १८२ रूपये दर मिळाला. सोमवार दि. १८ मे रोजी २ हजार ८५४ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन ७ हजार ७२१ रूपये दर मिळाला. तर बुधवार दि. २० मे रोजी ४ हजार ७२६ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन यावर्षीचा सर्वाधिक ८ हजार ५१ रूपये दर मिळाला. त्यामुळे सोयाबीन आगामी काळात १० हजार रूपयांची पातळी ओलांडणार का याची शेतकरी व व्यापा-यामध्येही उत्सूकता निर्माण झाली आहे.
















