24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमुख्य बातम्याअखेर १० मिनिटांच्या ‘डिलिव्हरी’ला ब्रेक! सरकारी हस्तक्षेपानंतर ‘गिग वर्कर्स’ला दिलासा

अखेर १० मिनिटांच्या ‘डिलिव्हरी’ला ब्रेक! सरकारी हस्तक्षेपानंतर ‘गिग वर्कर्स’ला दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात गिग वर्कर्सच्या आंदोलनानंतर आणि केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर क्विक कॉमर्स क्षेत्रात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. झटपट डिलिव्हरीसाठी ओळख असलेली ‘ब्लिंकीट’ आता आपल्या ब्रँडिंगमधून ‘१० मिनिटांत डिलिव्हरी’ हा शब्दप्रयोग काढून टाकण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठराविक वेळेत डिलिव्हरी केली जाईल अशी जाहिरात देणे थांबवावे, अशी स्पष्ट सूचना केंद्र सरकारने केली. कारण अशा घोषणांमुळे डिलिव्हरी बॉयवर वेग वाढवण्याचा अप्रत्यक्ष दबाव येतो आणि त्यामुळे अपघातांचा धोका वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी थेट हस्तक्षेप करत संबंधित कंपन्यांशी चर्चा सुरू केली.

केंद्र सरकारने केवळ ब्लिंकीट नव्हे, तर स्विगी, झोमॅटो आणि झेप्टो या कंपन्यांशीही चर्चा केली. या चर्चांमध्ये सर्व कंपन्यांनी जाहिरातीतून ठराविक डिलिव्हरी वेळेचा उल्लेख न करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे. १० मिनिटांच्या डिलिव्हरीचे ब्रँडिंग न करणे, हा क्विक कॉमर्स क्षेत्रातील मोठा बदल मानला जात आहे. स्पर्धा कायम असली तरी, आता कंपन्यांना कामगारांच्या सुरक्षेचा आणि सरकारच्या नियमांचा अधिक गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR