मुंबई पोलिस सतर्क, मुंबईत जाणारच
जालना : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजीच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यासाठी १९ तारखेला मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार होते. त्या संदर्भात जरांगे पाटील यांनी आझाद मैदान पोलिसांना हमीपत्रही दिले होते. मात्र, पोलिसांनी गेल्यावर्षीच्या अटी, शर्तींचा भंग केल्याचा दाखला देत परवानगी नाकारली. मागच्या आंदोलनात नियम व अटींचा भंग केल्याचे पोलिसांनी नमूद केले.
मनोज जरांगे पाटील यांनी जरी मुंबई पोलिस आयुक्त यांना पत्र लिहून परवानगी मागितली असली तरी जरांगे पाटील यांनाही मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमीच होती. तसेच जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावून मुंबईत न येण्याबाबत कळवले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या मागील आंदोलनावेळी मराठा आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते. मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर रास्ता रोको करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. तसेच आंदोलनादरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन केले होते.
दरम्यान, येऊ घातलेला गणेशोत्सव लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच या दरम्यान मराठा आंदोलन झाल्यास त्याचा भार हा पोलिस यंत्रणेवरही येऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी आम्ही संविधानाप्रमाणे चालतो. सरकारने कायदा पायदळी तुडवला तर न्यायालय न्याय देते. आम्ही सरकारच्या नियमांशी बांधिल नाही. द्वेष भावनेने परवानगी नाकारली आहे, असा आरोप जरांगेंनी केला.
जरांगे मुंबईत आंदोलन करू शकतात, असे न्यायालय म्हणत असताना यातून द्वेष उफाळून येत आहे. गेल्यावर्षीही गणेशोत्सव होता. तरीही आम्ही शांततेत आंदोलन केले. मिरवणूक गणेशोत्सवाची होईल. ठरल्याप्रमाणे आम्ही उपोषण करू. आमचे वकील आजपासून कामाला लागतील, असेही पुढे जरांगेंनी म्हटले. आता पोलिस आयुक्त यांच्याकडे जायचे की, आणखी काय करायचे, ते वकील ठरवतील. पोलिस निरीक्षकांनी कायदा पायाखाली तुडवला आहे. सोयीनुसार कायदा चालवता येणार नाही, असे जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून राज्य
अस्थिर करण्याचे काम
राज्य अस्थिर करण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. गेल्यावर्षी कायदा नव्हता का, हे नवीन कायदा चालवणारे झाले का, ही तर हुकूमशाही आणि गुंडगिरी आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. तुम्ही दलित, मुस्लिमांवर अन्याय करणार, आदिवासी, बंजारा, धनगर, मराठ्यांवर अन्याय करणार, शेतक-यांचे कंबरडे मोडून काढणार… तुम्हाला राज्य अस्थिर करायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मी शरण येणार नाही
फडणवीसांना मरणच पाहिजे ना तर असे मरण आले तरी चालेल, पण शरण येणार नाही, गुडघे टेकणार नाही. आडमुठ्या सरकारचे धोरण आम्हाला मान्य नाही. या सगळ््या गोष्टीला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहेत, असेही जरांगे पाटील म्हणाले. आम्ही न्यायालयाच्या अटी-शर्ती पाळून आंदोलन करणार आहोत, तरीही विरोध का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ही तर हुकुमशाही
अशा पद्धतीने रोखणार असाल तर मग हे संविधानाचे राज्य नाही. येथे सरळ सरळ हुकूमशाही आणि गुंडगिरी चालली आहे. त्यांनी जे षड्यंत्र रचले, त्या दिशेने ते चालले आहेत. न्यायदेवतेचे सगळे नियम आम्हाला मान्य आहेत, परंतु असल्या आडमुठ्या सरकारचे नियम आम्हाला मान्य नाहीत, असे जरांगे पाटील म्हणाले.
अन्यथा सलाईन,
पाणी बंद करून टाकू
१५ तारखेला आम्ही इथून जाणार, तुम्ही जर असेच वागणार असाल तर सरकार म्हणून महाराष्ट्रातील जनता, न्यायदेवतेचाही अपमान करीत आहात. गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करून असे वागणार असाल तर आजपासून आम्ही सलाईन, पाणी हे सगळे बंद करून टाकू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
















