मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आमदार-खासदार फुटीवरून राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या १५ दिवसांत शिवसेनेला दोनवेळा जबर धक्के बसले. आधी ६ खासदारांनी बंड करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर, नंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेतून विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी अर्ज केला.
या दोन्ही घटना ताज्या असतानाच आणखी एका आमदाराला २० कोटींची ऑफर दिल्याची माहिती आज संजय राऊतांनी दिली. तसेच, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबतही भाष्य केले. यावेळी त्यांनी टॉलस्टॉयच्या गोष्टीचाही संदर्भ दिला.
संजय राऊत म्हणाले, टॉलस्टॉयची गोष्ट सर्वांसाठी आहे. माणसाने कुठे थांबायचं हे ज्याला कळत नाही, त्याचा अंत वाईट आहे. बायबल, हिंदुत्व, पुराणात कोणत्याही धर्मात एक तत्त्व आहे; तुम्हाला कुठे थांबलं पाहिजे हे कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला समाधान होत नाही. तुम्ही आमदार-खासदार फोडताय, कार्यकर्ते फोडताय, पैसे देताय. कालही एका लिंगाडे नावाच्या आमदाराला २० कोटींची ऑफर दिली. किती पाहिजे तुम्हाला? मग स्ट्रेसमुळे इस्पितळात जाऊन दाखल व्हावं लागतं. हे थांबलं पाहिजे, असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली.
















