ठाणे : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले ओसंडून वाहत असून सखल भागात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच रायगडमधून एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील ऐतिहासिक श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या मुख्य मंदिरात पुराचं पाणी शिरले आहे.
गेल्या काही तासांत झालेल्या ढगफुटीसदृश आणि अतीमुसळधार पावसामुळे पाली शहरासह मंदिर परिसराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील मुख्य सभागृहात पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणावर पाणी साचल्याचे पाहायला मिळत असून, यामुळे स्थानिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, मंदिरात पाणी साचल्यामुळे आणि पूर परिस्थितीमुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली असून, प्रशासनाने भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सभागृहात पहिल्यांदाच पाणी
स्थानिक नागरिक आणि जुन्या जाणत्या लोकांच्या म्हणण्यानुसार, पाली शहरात यापूर्वीही अनेकदा पूर आला आहे, मात्र श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या मुख्य सभागृहात पाणी शिरण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. मंदिराच्या पाय-यांवरून पाणी थेट आतमध्ये आल्याने संपूर्ण सभागृह जलमय झाले आहे.
रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने आधीच रेड अलर्ट जारी केला असून शाळा-महाविद्यालयांना सुट्टया जाहीर केल्या आहेत. अशातच आता ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरांमध्येही पाणी शिरू लागल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















