नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शासकीय विश्रामगृहात राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थ्यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्या समोरच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या या आक्रमक मागणीवर प्रत्युत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी ज्यावेळेस राजीनामाचा द्यायचा असेल त्यावेळेस कोणाला सांगायची गरज नाही, मी स्वत:हून राजीनामा देईन, असे भुसे म्हणाले.
मालेगाव शासकीय विश्रामगृहात मंत्री दादा भुसे आणि वंचित सम्यक विद्यार्थ्यांची ही बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी टीईटी पेपरफुटीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. राज्यात पेपर फुटी झाल्यानंतर आजपर्यंत कोणत्याही मंत्र्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला नाही. जर तुम्ही या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, तर हा संपूर्ण राज्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय ठरेल, अशी मागणी वंचित आघाडी व सम्यक विद्यार्थ्यांनी लावून धरली. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या प्रकरणांचा हवाला देत माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कार्यकाळातही असाच घोटाळा झाला होता, अशी आठवण करून दिली.
८ दिवसांचा अल्टिमेटम
विद्यार्थी प्रतिनिधींनी मंत्री दादा भुसे यांना केवळ निवेदन दिले नाही तर थेट इशाराही दिला. आमच्या मागण्यांवर पुढील ८ दिवसांत सकारात्मक निर्णय होऊन मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
















