कोल्हापूर : प्रतिनिधी
कराडमधील काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील या पुलावर स्कॉर्पिओ आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. दस-यानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन घरी परतताना या मित्रांवर काळाने घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील सात मित्र रविवारी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले होते.
दर्शन आटोपून रात्री ते स्कॉर्पिओ गाडीतून गावाकडे निघाले होते. रात्री अकराच्या सुमारास कराड शहराजवळील उड्डाणपुलावर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्कॉर्पिओ आणि ट्रकची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी होती की, स्कॉर्पिओचा पूर्णपणे चक्काचूर झाला. गाडीतील तेजस देशमुख ( वय २५), सागर निंबाळकर (२३), सुयश चिंचकर (२०) आणि रोहित धोत्रे (२१) या चार तरुणांचा मृत्यू झाला.
तर अपघातात ऋतुराज दुबळे (२१), शंतनू शिंगाडे (२०) आणि अमन तांबोळी (२३) हे तिघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने नजीकच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नव्या उड्डाणपुलावरील अपघाताने सुरक्षेचा प्रश्न
कराड शहराजवळील हा सहापदरी उड्डाणपूल काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, पुलावर झालेल्या या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने कातरखटाव गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
















