लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये व विविध कोचिंग क्लासेस नियमितपणे सुरू झाले असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत लातूर पोलीसांकडून विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विनाकारण रेंगाळणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, त्यांची छेड काढणे अथवा त्यांना मानसिक त्रास देणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दामिनी पथकाला दिले आहेत. त्यानूसार दामिनी पथकाने ८५ जणांवर कारवाई केली आहे. दामिनी पथकाकडून दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस तसेच संवेदनशील परिसरात नियमित गस्त घालण्यात येत आहे. अचानक तपासणी, संशयितांवर लक्ष ठेवणे तसेच विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेबाबत विश्वास निर्माण करण्याचे कामही या पथकाकडून सातत्याने केले जात आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विनाकारण रेंगाळणा-या व संशयास्पद वर्तन करणा-या एकूण ८५ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११० व ११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अशा प्रकारचे गैरवर्तन करणा-या व्यक्तींविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
लातूर पोलीसांचे सर्व विद्यार्थिनी, पालक व शैक्षणिक संस्थांना आवाहन आहे की, शाळा, महाविद्यालय किंवा कोचिंग क्लासेस परिसरात कोणताही तरुण विनाकारण त्रास देत असल्यास, पाठलाग करत असल्यास किंवा संशयास्पद हालचाली करत असल्यास त्याची त्वरित माहिती द्यावी. अशा घटना लपवून न ठेवता आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा. तसेच परिसरात गस्त घालणा-या दामिनी पथकाकडे, अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार नोंदवावी. महिलांच्या व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी लातूर पोलीस कटिबद्ध असून अशा विशेष मोहिमा नियमितपणे सुरू राहणार आहेत, असा संदेश लातूर पोलिसांनी दिला आहे.
















