मुंबईत वाहतूक विस्कळीत, मराठवाड्यात मात्र दुष्काळाचे सावट
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. सोमवारी थाटात गणरायाचे आगमन होणार आहे. बाप्पांचे आगमन होत असतानाच ब-याच दिवसांपासून दडी मारलेला पाऊस रविवारी मुंबईत सकाळपासूनच धो-धो बरसायला सुरुवात झाली. अर्थात दुष्काळी सावटात बाप्पाच पाऊस घेऊन आले. मुंबईत दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. मुंबईसह उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू आहे. दुसरीकडे मराठवाड्यात दीड महिन्यापासून पाऊस गायब असल्याने पिके करपली असून, भीषण दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. परंतु मराठवाड्याला बाप्पा पावणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अख्खा पावसाळा संपत आला, परंतु राज्यात तुरळक भागांतच पाऊस झाला. विशेषत: मुंबई, पुणे, ठाण्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. परंतु मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांकडे पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरविली. त्यामुळे अजूनही हा भाग पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात आहे. विशेषत: मराठवाड्यातील बहुतांश भागांतील पिके करपली आहेत. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. या भागावर सध्या दुष्काळी सावट आहे. अशा स्थितीत राज्यात ब-याच भागांत पावसाने हजेरी लावली असून, मराठवाड्यातही ब-याच भागांत ढगाळ वातावरण असल्याने आता तरी पाऊस बरसेल, अशी आशा आहे. त्यातच अहमदपूर, चाकूरमध्ये सरी बरसल्या आहेत. त्यामुळे आशा पल्लवित झाल्या असून, दुष्काळाच्या सावटात अडकलेल्या मराठवाड्यावर कृपा होणार की, असेच कायम डोळे वटारणार, हे पाहावे लागेल.
दरम्यान, गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच मुंबईत आज पावसाचा जोर वाढला. मुंबईसह उपनगरे, पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, राज्यातही काही भागांत पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा या भागात रस्त्यावर पाणी साचले असून, या भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईसह परिसरात रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता. सायंकाळी ६ नंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला. ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार, अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज आज खरा ठरला.
मराठवाड्याला बाप्पा पावणार?
कोकणात आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस कोसळला. परंतु मराठवाड्याकडे कायम पाठ आहे. मागच्या दीड महिन्यापासून तर पाऊसच नाही. त्यामुळे खरीप हंगामच धोक्यात आला आहे. मात्र, विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भासह कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मराठवाड्याला बाप्पा पावणार का, याकडे लक्ष लागले आहे.
अहमदपूर, चाकूर
तालुक्यात हजेरी
पावसाअभावी लातूर जिल्ह्यात खरीप पिके माना टाकत आहेत. अशा स्थितीत रविवारी सायंकाळी अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात हलक्या सरी कोसळल्या. मात्र, जिल्ह्यात काही भागांत थेंबांचा शिडकावा वगळता पावसाचा कुठे जोर दिसला नाही.
















