नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या शक्तिशाली देशांच्या समूहाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठीची अधिकृत वेबसाइट आणि लोगोचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी भारताचा दृष्टिकोन ‘मानवता प्रथम’ आणि ‘लोककेंद्रित’ असल्याचे स्पष्ट केले.
ब्रिक्स २०२६ चा लोगो हा केवळ एक चिन्ह नसून तो भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि जागतिक ऐक्याचा संदेश आहे. या लोगोची रचना भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या ‘कमळा’ वर आधारित आहे. लोगोच्या मध्यभागी ‘नमस्ते’ ही मुद्रा आहे, जी स्वागत आणि आदराचे प्रतीक आहे. लोगोच्या पाकळ्यांमध्ये ब्रिक्सच्या सर्व सदस्य देशांच्या ध्वजांचे रंग समाविष्ट करण्यात आले आहेत, जे ‘विविधतेत एकता’ दर्शवतात.
२०२६ मध्ये ब्रिक्स समूहाच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दोन दशकांत हा समूह उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा एक मोठा आवाज म्हणून पुढे आला आहे. जयशंकर यांनी सांगितले की, भारत या संधीचा उपयोग ‘ग्लोबल साउथ’ म्हणजेच विकसनशील देशांच्या समस्या जगासमोर मांडण्यासाठी करेल. यामध्ये संयुक्त राष्ट्रे, जागतिक बँक आणि आयएमएफ सारख्या संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा भारताचा आग्रह असेल.

