नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध खूप अगोदरपासूनच बिघडलेले आहेत. या दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंध सुरळीत व्हावेत यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. परंतु अद्याप यात यश आलेले नाही. २०२५ साली पहलगाम हल्ल्यानंतर तर भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध जास्तच बिघडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता कोणताही व्यापार होत नाही.
भारताने पाकिस्तानसोबत कोणताही व्यवहार करणार नसल्याचे जाहीर केलेले असले तरीही पाकिस्तान मात्र भारताविरोधात अजूनही कुरापती करत असतो. भारताने पाकिस्तानची वेगवेगळ्या मार्गांनी कोंडी केलेली आहे. सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णयही याच रणनीतीचा भाग आहे. दरम्यान, याच सिंधू जलवाटप कराराबाबत पाकिस्तानचे दुखणे काय आहे? याची भारताचे माजी राजदूत विनय महोन क्वात्रा यांनी पोलखोल केली आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून काम केलेले विनय मोहन क्वात्रा यांनी सिंधू जलवाटप करारावर सविस्तर भाष्य केले आहे.
भारताने पाकिस्तानसोबत मैत्री आणि सद्भावनेच्या उद्देशाने हा करार केला होता. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानच्या आचरणात कोणताही बदल झालेला नाही, असे मत क्वात्रा यांनी व्यक्त केले आहे. न्यूजविक मध्ये त्यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी पाकिस्तान कोणती चूक करतोय. पाकिस्तान अजूनही मागे का आहे? याची कारणं सांगितली आहेत. सिंधू जलवाटप करार स्थगित केल्याने अडचणीवाढणार नाहीत. उलट अगोदरपासूनच जे संबंध बिघडलेले आहेत, त्यांचा औपचारिक स्वीकार करणे होय, असे मत क्वात्रा यांनी व्यक्त केले आहे. भारताने २३ एप्रिल २०२५ रोजी सिंध जलवाटप करार स्थगित केला होता. भारताच्या याच निर्णयाववर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानात नुकतेच एक संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाची सगळीकडे चर्चा चालू असताना राजदूत विनय क्वात्रा यांनी लेख लिहून पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
४० टक्के पाणी जाते वाया
सिंधू नदीचे साधारण ८० टक्के पाणी हे पाकिस्तानात जाते. परंतु यातील बरेच पाणी अजूनही वाया जाते. पाकिस्तानला मिळणा-या एकूण पाण्यापैकी फक्त ४० टक्केच पाणी पाकिस्तानातील शेतापर्यंत पोहोचते, असे सांगत पाकिस्तानचे धोरण हे तकलादू आहे असे क्वात्रा यांनी या लेखात सांगितले आहे.
















