Homeलातूरमांजरा प्रकल्प व जलशुद्धीकरण केंद्रास आयुक्तांची भेट

मांजरा प्रकल्प व जलशुद्धीकरण केंद्रास आयुक्तांची भेट

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांनी पाणीपुरवठा विभागातील अत्यावश्यक कामांचा आढावा घेण्यासाठी  दि. १९ जून रोजी धनेगाव येथील मांजरा प्रकल्प तसेच हरंगुळ व आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. बोरवटी व कव्हा येथील एसटीपी प्लांटलाही भेटी देऊन त्यांनी पाहणी केली.
गुरुवारी आयुक्त श्रीमती मानसी यांनी कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण, शाखा अभियंता डी. जी. डोईजोडे यांच्यासह संबंधित विभागाच्या कर्मचा-यांना घेऊन मांजरा प्रकल्पास भेट दिली. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर धनेगाव येथून उचलण्यात येणा-या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पंपिंग बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी,अशा सूचनाही त्यांनी केल्या. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० योजनेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची त्यांनी पाहणी केली. प्रकल्प व्यवस्थापक, सल्लागार व ठेकेदारांनी काम गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करावे, असे त्या म्हणाल्या.शहरास होणारा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या दृष्टीने पंपिंग चालू ठेवावे.हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून दूषित व पिवळा पाणीपुरवठा होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेऊन शहरास स्वच्छ पाणी पुरवावे, असे त्यांनी सुचित केले. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाअंतर्गत शहरात भुयारी गटार योजना टप्पा १ अंतर्गत कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आयुक्तानी कामाची तपासणी केली. ही कामे वेळेत पूर्ण  करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.
कव्हा येथील एसटीपी प्लांटला तसेच आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन तेथील अडीअडचणी आयुक्तांनी जाणून घेतल्या.बोरवटी येथे ३२ एमएलडी क्षमतेचा मलनि:सारण प्रकल्प उभारला जात आहे. तेथेही आयुक्तांनी भेट दिली.प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी विद्युत पुरवठा सुरू करून तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR