मुंबई : प्रतिनिधी
राज्यभर समाधानकारक पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. यातच आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली.
मुंबईसह कोकणपट्टीत आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टी, संपूर्ण कोकण आणि सह्याद्रीच्या घाटभागात २९ जून ते २ जुलै या काळात पावसाचा जोर वाढेल.
बंगालच्या उपसागरात तयार होणा-या हवामान प्रणालीमुळे १ आणि २ जुलै या कालावधीत तळकोकण, गोवा तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढलेला असेल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबईसह कोकण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यातील इतर भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील लोणावळा येथे गेल्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वी नैऋत्य मोसमी वा-यांनी काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल मंदावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातही पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे.
















