लातूर : प्रतिनिधी
रेणापूर पोलिसांनी तत्परता दाखवत घरफोडी चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी या कारवाईत चोरीस गेलेला ६ लाख ६० हजार ५०० रुपये किंमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यातील चार आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे.
रेणापूर पोलीस ठाण्यात शेख जियाउद्दीन वलीयोद्दीन (वय ५५, व्यवसाय शेती, रा. सराया गल्ली, रेणापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतातील आकाड्यावर असलेल्या पत्र्याच्या खोलीत ठेवलेली विविध साहित्ये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. दि. ३ जून रोजी रात्री १० वाजल्यापासून ते दि. ४ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या शेतात प्रवेश केला. तेथील पत्र्याच्या खोलीतील लोखंडी बॉक्स तसेच मोठ्या प्रमाणात लोखंडी अँगल असा माल चोरून नेला. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या निर्देशांवर पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील माहिती संकलित करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची हालचाल शोधून काढली. तपासादरम्यान आरोपी चोरीचा माल विक्री करण्यासाठी पिंपळफाटा, रेणापूर येथील एका हॉटेलसमोरील भंगार दुकान परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत प्रविण प्रकाश आडे (वय २२), सुरज विनायक चव्हाण (वय १९), विजय सुरेश चव्हाण (वय २१), एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये १ एचपी पाण्याची मोटार, वॉशिंग मशीन, लोखंडी बॉक्स, सुमारे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे १० लोखंडी अँगल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन यांचा समावेश आहे. एकूण ६ लाख ६० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
















