Homeलातूरस्पर्धा परीक्षेसाठी माझ्या टीमद्वारे मी प्रयत्नशील राहील

स्पर्धा परीक्षेसाठी माझ्या टीमद्वारे मी प्रयत्नशील राहील

लातूर : प्रतिनिधी
अनेक राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनाही मार्गदर्शन केले असून सध्या स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या पॅनलवर मी कार्य करीत आहे. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा करिता माझ्या टीमद्वारे माजी विद्यार्थी म्हणून मी प्रयत्नशील राहील असे, प्रतिपादन माजी उपसंचालक यशवंत मानखेडकर यांनी केले.
यशवंत माणखेडकर यांनी १९८५-८६ ला महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये समाजकार्य विभागाच्या बी.एस.डब्ल्यू.अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि १९८७-८८ ला बी.एस.डब्ल्यू.ची पदवी सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथून पाचव्या क्रमांकाने मेरिटमध्ये येऊन प्राप्त केली. त्यांचा महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षामध्ये प्राचार्य प्रो. डॉ. सिद्राम डोंगरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते आपल्या भावना व्यक्त करताना बोलत होते. यावेळी समाजकार्य विभागाचे प्रो.डॉ.संजय गवई, पर्यवेक्षक डॉ. गुणवंत बिरादार,मिरा मानखेडकर यांची उपस्थिती होती.
लातूर शहरात कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य, व्यावसायिक अभ्यासक्रम, पदव्युत्तर शिक्षण, संशोधन केंद्र आणि बहि:स्थ शिक्षण केंद्राच्या माध्यमातून समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे मराठवाड्यातील एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला क्रीडा व खेल मंत्रालय, भारत सरकारच्या महाराष्ट्र राज्याच्या नेहरू युवा केंद्राच्या उपसंचालक पदापर्यंत मजल मारता आली. त्यामूळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७मध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे सांगून माणखेडकर म्हणाले की, मी अहमदपूर तालुक्यातील मानखेड या अत्यंत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील एक विद्यार्थी होतो.
 बी.एस.डब्ल्यू.ला शिकत असताना दिवसभर महाविद्यालयाचे नियमित तास करायचे आणि संध्याकाळी तेलाच्या घाणीमध्ये काम करायचो. त्यामुळे माझ्या हाताला फोड यायचे म्हणून महाविद्यालयात येताना हातामध्ये हॅन्डग्लोज घालून येत होतो. या अभ्यासक्रमामुळे मी विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संस्थांमध्ये उच्चस्थ पदावर कार्य करू शकलो. नुकताच २०२३ मध्ये क्रीडा व खेल मंत्रालय, भारत सरकारच्या महाराष्ट्र राज्याच्या नेहरू युवा केंद्राच्या उपसंचालक पदावरून सेवानिवृत्त झालो. जगाच्या अनेक राष्ट्रांमध्ये जाऊन मी माझ्या कार्याची माहिती दिली आहे.
तसेच समाजकार्य विभागाच्या चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणीना त्यांनी उजाळा देऊन प्राचार्य प्रा.एम.एस. सितानगरे, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, प्रा.बी.एस. पळसकर, प्रा. नागनाथ स्वामी, प्रा. गिरजाप्पा मुचाटे आणि डॉ. ईश्वर शेटकार यांची आठवण करून आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी समाजकार्य विभाग, दुग्धशास्त्र विभाग, कुस्ती प्रशिक्षण केंद्र आणि महाविद्यालयाच्या परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR