छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजप व एमआयएमच्या अकोट येथील युतीवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक करायचे व आतून मात्र सत्तेसाठी अकोट पॅटर्न राबवायचा हा भाजपच्या लेखी जनमताचा आदरच ठरतो, असे ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपवर खोचक टीका करत म्हटले आहे.
राज्यात सध्या मुंबई महापालिकेसह २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक उरला असताना प्रचार टोकाला पोहोचला आहे. त्यातच अकोट नगरपालिका निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर भाजप व एमआयएमची कथित युती झाली आहे. यामुळे हिंदुत्वाचे राजकारण करणा-या भाजपला विरोधकांच्या प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. भाजपने अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी एमआयएम व इतर पक्षांना सोबत घेऊन अकोट विकास मंच स्थापन केला. यावरून ठाकरे गटाने भाजपवर टीकेची झोड उठली आहे.
भाजप + एमआयएम = अकोट पॅटर्न. भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या मुलाला नगरसेवक करण्यासाठी थेट ‘एमआयएम’च्या पाचही नगरसेवकांनी भाजपच्या खांद्याला खांदा लावला. ‘राष्ट्रभक्तीचा’ नवा अध्याय लिहिणा-या या ‘फेव्हिकॉल’ युतीसाठी अभिनंदन.
वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक करायचे आणि आतून मात्र सत्तेसाठी ‘अकोट पॅटर्न’ राबवायचा, हा भाजपच्या लेखी ‘जनमताचा आदरच’ ठरतो नाही का? असा प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या. यात भाजपच्या माया धुळे यांना नगराध्यक्षपद मिळाले. या निवडणुकीत भाजपने एमआयएमवर टीकेची झोड उठवली. पण निवडणुकीनंतर अकोटच्या विकासाच्या नावाखाली भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार व एमआयएमशी हातमिळवणी केली. हे सर्व पक्ष वेगवेगळ्या विचारधारांचे असताना विरोधक भाजपविरोधात चवताळून उठले आहेत. या प्रकरणी राजकीय अडचण होत असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेस व एमआयएमसोबत भाजपची युती केव्हाच होऊ शकत नाही. हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असे ते स्थानिक नेत्यांचे कान टोचत म्हणाले.

