बार्शी : आठ वर्षांनंतर झालेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर काल गुरुवारी बार्शी येथे दुपारी बार्शी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत सभापतीपदी खडकलगावच्या भाजपच्या मीनाक्षीताई रोंगे यांची तर उपसभापतीपदी वैरागचे संतोष दादा निंबाळकर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.
सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित सभापती पदाच्या खुर्चीवर उपळाई गणातील भाजपच्या विजयी उमेदवार मीनाक्षी रोंगे यांची अखेर वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे वैराग भागाचे नेते संतोष दादा निंबाळकर यांची उपसभापतीपदी एकमताने बिनविरोध निवड झाल्याने वैराग भागात आनंदोत्सव साजरा केला गेला. बार्शी पंचायत समिती निवडणूकीत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या सर्व १२ पैकी १२ पंचायत समिती सदस्यांनी विजय मिळवत सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता बार्शी पंचायत समिती सभापतीपदी व उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी बार्शी पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली.
या निवड प्रक्रियेत सभापतीपदी खडकलगावच्या भाजपच्या मीनाक्षीताई रोंगे यांची तर उपसभापतीपदी वैरागचे संतोष दादा निंबाळकर यांच्या निवडीनंतर कुणाच्या गळ्यात सभापती अन उपसभापती पदाची माळ पडणार या गोष्टीला पूर्णविराम मिळाला आहे. निवडीनंतर मीनाक्षीताई रोंगे व संतोष दादा निंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्यासह माजी आमदार, विकासरत्न राजेंद्र राऊत यांचा आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे सांगितले.
बिनविरोध निवडीमुळे बार्शी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी बार्शी पंचायत समितीसमोर पेढे वाटून, गुलाल उधळून आनंद साजरा केला. खडकलगावच्या मीनाक्षी रोंगे यांची बार्शी पंचायत समिती सभापतीपदी पदावर निवडीमुळे खडकलगावात रात्री आनंदोत्सव साजरा केला. तसेच वैरागमध्येही उपसभापती संतोष निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

