Homeमुख्य बातम्याअधिवासातील बदलामुळे विषारी सापांच्या वर्तनात सुधारणा

अधिवासातील बदलामुळे विषारी सापांच्या वर्तनात सुधारणा

सर्पदंश | प्रतिविष निर्मितीच्या गुणवत्तेत वाढ; प्राणी कल्याण, संशोधन नीतिमत्ता, मानवी आरोग्य क्षेत्रात अर्थपूर्ण परिणाम

मुंबई : विशेष प्रतिनिधी
हाफकिन संस्थेने केलेल्या एका वैज्ञानिक अभ्यासात असे आढळून आले आहे की, विषारी सापांच्या अधिवासात थोडासा बदल केल्याने त्यांचे आरोग्य, वर्तन आणि एकूणच स्वास्थात चांगली सुधारणा होऊ शकते. हा निष्कर्ष केवळ विषारी सापांच्या चांगल्या काळजीशी संबंधित नाही तर या सुधारणेचा थेट परिणाम जीव वाचवणा-या सर्पदंश प्रतिविष निर्मितीसाठी वापरल्या जाणा-या सापांच्या विषाच्या सुरक्षितता व गुणवत्तेवर होतो.
हाफकीन संस्थेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मृणाल घाग-सावंत यांच्या नेतृत्वाखाली या अनुषंगाने अभ्यास करण्यात आला. यामध्ये, भारतीय नाग, घोणस या सापांच्या निवास व्यवस्थेत अँस्पन लाकडाच्या भुसभुशीत काड्या आणि पारंपरिक कागदी बेडिंग यांची तुलना करण्यात आली.  हा अभ्यास डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या विशाखापट्टणम येथे १३ व्या आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा प्राणी शास्त्रज्ञ संघटनेच्या परिषदेत सादर करण्यात आला. त्याबाबत विस्तृत व्याख्यान सादरीकरणासाठी तृतीय पुरस्कार मिळाला आहे.
संशोधकांच्या मते, सापांमधील ताणतणाव कमी झाल्यास त्यांची शारीरिक प्रक्रिया अधिक निरोगी राहते, ज्यामुळे प्रतिविषासाठी वापरले जाणारे सापांचे विष उच्चतम दर्जाचे बनते. भारतात दरवर्षी हजारो सर्पदंशग्रस्तांचे प्राण वाचवण्यात सर्पदंश प्रतिविष महत्त्वाची भूमिका बजावते. सदर संशोधन कार्य प्राणी कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य यांचा समतोल साधण्याच्या दिशेने पुराव्याधारित सुधारणा अधोरेखित करत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले छोटे बदल देखील प्राणी कल्याण, संशोधन नीतिमत्ता आणि मानवी आरोग्याच्या क्षेत्रात मोठे आणि अर्थपूर्ण परिणाम देऊ शकतात
हे संशोधन का महत्त्वाचे आहे?
सापांच्या निवासासाठी वापरल्या जाणा-या पृष्ठभागाचा आर्द्रता, तापमान संतुलन आणि नैसर्गिक वर्तनावर मोठा प्रभाव पडतो.
  –  सापांचे आरोग्य अधिक स्थिर राहते
  –  साप हाताळणे अधिक सुरक्षित होते
  –  विषनिर्मिती सातत्यपूर्ण व दर्जेदार राहते
  –  हे सर्व घटक प्रभावी सर्पदंश प्रतिविष निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR