लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याचे हरित क्षेत्र वाढावे, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी आणि अधिकाधिक नागरिकांनी वृक्षारोपणात सहभागी व्हावे, या उद्देशाने गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानने आणखी एक लोकहिताचा उपक्रम सुरू केला आहे. वृक्षारोपणासाठी लागणारे खड्डे सहज आणि कमी वेळात तयार व्हावेत यासाठी प्रतिष्ठानने खड्डे करण्याची मशीन पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
वृक्षारोपण करताना मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार करणे हे अनेकदा वेळखाऊ आणि खर्चिक ठरते. त्यामुळे अनेक संस्था व नागरिक वृक्ष लागवडीपासून दूर राहतात. ही अडचण लक्षात घेऊन वसुंधरा प्रतिष्ठानने ही मशीन कोणतेही भाडे न आकारता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शाळा, महाविद्यालये, मंदिरे, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था, शेतकरी, युवक मंडळे तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे अधिक सोपे होणार आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे कमी वेळात अधिक खड्डे तयार करता येणार असून श्रम, वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांसह विविध संस्था या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लागवड करू शकतील.
वसुंधरा प्रतिष्ठान गेल्या अकरा वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, मोफत रोपे वितरण, ‘एक विद्यार्थी-एक झाड’, ‘एक शिक्षक-एक झाड’, झाडाचा गणपती, झाडांचे वाढदिवस, सेल्फी विथ ट्री, खिळे मुक्त झाड अभियान, वृक्ष दत्तक योजना, वृक्ष संवर्धन हेल्पलाइन, प्रत्येक सण झाडासोबत यांसारखे अनेक उपक्रम राबवत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढावा, हा प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश असून या नवीन उपक्रमातूनही त्याच ध्येयाला बळ मिळणार आहे. ज्या व्यक्ती, संस्था किंवा गावांना वृक्षारोपणासाठी ही मशीन हवी आहे त्यांनी ८८८८८८४०२० या वसुंधरा प्रतिष्ठानच्या मोफत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मशीन उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा आणि मुख्य समन्वयक राहुल माशाळकर यांनी केले आहे. आज एक झाड लावणे म्हणजे उद्याच्या पिढीला स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि निरोगी भविष्य देणे होय. चला, वृक्षारोपणाची चळवळ अधिक व्यापक करूया, असे आवाहनही वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
















