मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाले असून, उद्धवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या सहा खासदारांनी आज आपला वेगळा गट स्थापन केला आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान, या सहा खासदारांनी दिल्ली गाठली. तसेच तिथे लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनीही उद्धवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या उद्धवसेनेच्या सहा खासदारांच्या गटाला वेगळा गट म्हणून मान्यता दिली आहे.
२०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धवसेनेचे ९ खासदार निवडून आले होते. त्यामधील सहा खासदारांनी आज वेगळा गट स्थापन केला आहे. वेगळा गट स्थापन करणा-यांमध्ये संजय जाधव (परभणी), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय देशमुख (यवतमाळ वाशिम), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) यांचा समावेश आहे. उद्धवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र हे फुटलेले खासदार १९ जून रोजी होणा-या शिवसेनेच्या वर्धापनदिना दिवशी शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता देऊ नका : उद्धवसेनेची मागणी
उद्धवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेसोबत राहिलेले खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाझे यांनी संजय राऊत यांच्यासोबत मिळून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी उद्धवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या खासदारांच्या गटाला वेगळा गट म्हणून मान्यता देऊ नका, अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केली.
















