निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील जाजनूर-लांबोटा शिवरस्त्याच्या कामात पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाचा विचार न करता मोरी चुकीच्या ठिकाणी टाकल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करीत जाजनूर येथील शेतकरी सागर गोमसाळे यांनी मंगळवार (दि. ७ जुलै) पासून निलंगा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाज टाकून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे परिसरात लक्ष वेधले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
सागर गोमसाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाजनूर येथील पाझर तलावालगतची त्यांची वडिलोपार्जित शेती सन १९७८ मध्ये तलाव प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती मात्र, संबंधित जमीन सन २०२४ पर्यंत सातबारा उता-यावर त्यांच्या नावावर कायम होती. त्यानंतर ती सातबारा उता-यावरून कमी करण्यात आली. या जमिनीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जाजनूर-लांबोटा शिवरस्त्याचे काम करताना पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाच्या ठिकाणी मोरी न टाकता ती अन्य ठिकाणी बसविण्यात आली. परिणामी पावसाचे पाणी थेट त्यांच्या शेतात साचत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच मशागतीची कामे, शेतीमालाची वाहतूक आणि इतर कृषी कामांनाही अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.या संदर्भात संबंधित विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे गोमसाळे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. दोषी अधिका-यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
















