37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeधाराशिवउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात

परंडा : प्रशांत मिश्रा
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून तालुक्यातील सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी प्रचारासाठी मैदानात उतरल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे.

लोकसभेची निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर झाल्याने ते प्रचाराला लागले होते परंतु महायुतीचा तिढा सुटत नसल्यामुळे महायुतीची जागा कुणाला सुटणार या चर्चांना उधान आले होते. नंतर महायुतीचा तिढा सुटला व राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटास उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपासह शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. काही दिवसांत महायुतीच्या नेत्यांची नाराजी दूर झाली व युती धर्म पाळत महायुतीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी युतीचे सर्व नेते प्रचारास मैदानात उतरल्याने निवडणुकीची रंगत वाढली.

सुरुवातीला विद्यमान खासदारांनी प्रचारात जोर धरला, त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात दोन माजी आमदार व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावभेटींवर जोर दिला व प्रचार सभेदरम्यान आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांवर आरोप करून प्रश्नांचा भडिमार करत टीकास्त्र सोडल्याने निवडणूक एकतर्फी होते की काय? असे चित्र निर्माण झाले होते; परंतु नंतर महायुतीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली व आरोपांचे खंडन करत उत्तरे देत विकासाच्या मुद्यांवर बोलण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवल्याने सध्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणे मतदारसंघात राजकीय वातावरण तापले व या निवडणुकीत मतदारसंघातील उजनी ते मिरगव्हाण बोगदा, तेरणा कारखान्याचे भंगार व मतदारसंघातील शाश्वत विकास कामासाठी आणलेला भरीव निधी अशा अनेक मुद्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या.

सध्या लोकसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून येणा-या ७ तारखेला तालुक्यातील मतदार कोणाच्या झोळीत आपले मतरूपी दान करणार आहे ते ४ जून रोजी कळणार असून हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR