नागपूर : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टीशी संबंधित नेटवर्कविरोधात राज्यभर मोठी कारवाई केली असून, १०० हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. ही कारवाई अद्याप सुरू असल्याची माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. ते नागपूर विमानतळावर आज (११ जुलै) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंकज भोयर म्हणाले, शहजाद भट्टी हा पाकिस्तानात बसून महाराष्ट्र आणि देशाविरोधात कट रचत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने वेळेत कारवाई करून त्याचा कट उधळून लावला.
ते पुढे म्हणाले की, शहजाद भट्टीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ‘एटीएस’ने राज्यातील १५७ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान राज्यभरातील १०० हून अधिक जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणखी काही ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास एटीएसकडून सुरू असून, या कारवाईतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील पावलं उचलली जाणार असल्याचेही भोयर यांनी स्पष्ट केले.
ऑनलाईन पैशांच्या माध्यमातून शस्त्रे पुरवण्याचा कट शहजाद भट्टीच्या समर्थकांना शस्त्रे उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून आर्थिक व्यवहार केले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, महाराष्ट्र एटीएसने वेळीच कारवाई करून हा कट उधळून लावल्याची माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
















